
सोलापूर – विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात अनेक सभा घेणार असून सोलापुरातही 12 नोव्हेंबर रोजी त्यांची सभा निश्चित करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीत कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रदेश पातळीपासून केंद्रीय नेतृत्वापर्यंतच्या नेत्यांच्या सभा घेण्याचे धोरण ठरविले आहे. त्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तोफा धडाडणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नाशिक आणि धुळे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणी 8 तारखेला मोदी सभा घेणार आहेत. त्यानंतर दुसर्या टप्प्यात 12 नोव्हेंबर रोजी मोदी हे सोलापुरातील होम मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सोलापूर महापालिका, पोलीस प्रशासन आणि निवडणूक कार्यालयाकडे सभेसाठी परवानगी मागितली असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांतून भाजप निवडणूक लढवत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, माळशिरस आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार आहेत. याशिवाय अन्य मतदारसंघांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी मोदी जाहीर सभांमधून मते मागणार आहेत.