महालिंगराया-बिरोबा भेटीच्या सोहळ्याला लाखोंची उपस्थिती, भंडारा, खोबर्याची केली उधळण

मंगळवेढा – हुलजंती येथे श्री महालिंगराया व श्री बिरोबा या गुरू-शिष्याच्या भेटीचा अनुपम सोहळा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भंडारा व खोबर्याची उधळण करीत भाविकांनी महालिंगरायाच्या नावानं चांगभलं असा गजर केला.
हुन्नूरचा बिरोबा, सोन्याळचा विठोबा, उटगीचा ब्रह्मद, जिराअंकलगीचा बिरोबा, शिराढोणची शिलवंती, हुलजंतीचा महालिंगराया, शिराढोणचा बिरोबा आणि महालिंगरायाचा नातू कसगी येथील बगलीसिध्द या पालख्या सोहळ्यासाठी आल्या होत्या.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अमावास्येच्या रात्री शंकर पार्वती हे महालिंगराया मंदिराच्या कळसाला मुंडास गुंडाळून जातात. त्याला ध्वज असे म्हटले जाते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. यावर्षी मुंडास कळसाच्या चारही बाजूला समान सोडलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये पीक पाणी समान राहील अशी भाकणूक वर्तविण्यात आली.
यात्रेकरूंसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशामक दल, वैद्यकीय पथक, फिरते शौचालय, 24 तास वीजपुरवठा आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. दरम्यान, पालखी सोहळ्याच्यावेळी वरूणराजानेही हजेरी लावली.