देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ‘दक्षिण’मधील बंडोबा झाले थंड

सोलापूर – सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत महापालिकेतील दोन माजी पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकाच्या पित्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शनिवारी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे बंडखोर शांत झाले असून उद्या (सोमवारी) ते उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्यामुळे भाजपमधील बंडखोरी टळली आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. असे असताना राजेश काळे, श्रीनिवास करली या महापालिकेतील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक आणि माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांचे पिता श्रीशैल हत्तुरे अशा तिघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शनिवारी या तिघांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे बोलावले होते. यावेळी फडणवीस यांनी तिघांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
काळे आणि करली त्यांना पुन्हा महापालिकेत संधी देण्याबरोबरच बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळावर हत्तुरे यांना घेण्याबाबतचा शब्द देण्यात आल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून आपण उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे माजी उपमहापौर काळे यांनी सांगितले आहे. करली आणि हत्तुरे हेही उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले. हे तिघेही उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याने स्वपक्षातील नाराजी दूर करण्यात आमदार सुभाष देशमुख यांना यश आले आहे.