वैचारिक भूमिका घेऊन पत्रकारिता करण्याची गरज -शिंदे पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाट

सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरला वैचारिक भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आजही वैचारिक भूमिका घेऊन समाजजीवन सुधारणारी पत्रकारिता करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना पत्रमहर्षि स्व.रंगाअण्णा वैद्य आणि ज्येष्ठ संपादक स्व.बाबूराव जक्कल यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .यावेळी शिंदे बोलत होते. अभय दिवाणजी, नितीन फलटणकर, प्रशांत माने, आणि संजय पाठक या संपादकांचा पदोन्नतीबद्दल सत्कार यावेळी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी स्वागत खजिनदार विनोद कामतकर यांनी केले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले.
शिंदे म्हणाले, सोलापूरच्या पत्रकारितेला पत्रमहर्षि रंगाअण्णा वैद्य ,बाबूराव जक्कल यांच्यापासून वैचारिक पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. आज पत्रकारितेची नेमकी दिशा कुठे चालली आहे, हेच कळत नाही. त्यामुळे वैचारिक भूमिका घेऊन समाज सुधारण्यासाठी पत्रकारांनी पत्रकारिता करण्याची गरज आहे. सध्या पत्रकार हे कठीण परिस्थितीत काम करत आहेत. पत्रकारांच्या पाल्यांनीही अभ्यास करून चिंतन करून आपले भविष्य उज्वल करावे. कुठेही गेले तरी आपला प्रांत आणि देश विसरता कामा नये.
यावेळी फलटणकर,दिवाणजी ,पाठक ,माने यांनी मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष दशरथ वडतिले, मनोज व्हटकर, तात्यासाहेब पवार, श्रीकांत कांबळे आदींसह पत्रकार व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.
आज ना उद्या बोरामणी
विमानतळ सुरू होणारच : शिंदे
सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळाची जागा अपुरी पडत असल्याने बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा घेतली. पैसेही दिले. परंतु तिथे अचानक माळढोक आढळल्याचे सांगण्यात येते. परंतु माळढोक कुठे आहे ? तो दिसत नाही.
राजकारणासाठी अशा गोष्टी घातक आहेत. विकास झाला पाहिजे. ज्यांनी अडचणी निर्माण केल्या त्यांना त्या लखलाभ असो. सध्या किमान सोलापूर विमानतळ तरी चालू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच एक सुशीलकुमार गेला तरी दुसरा सुशीलकुमार येईल आणि आज ना उद्या बोरामणी विमानतळ सुरू होईल, असा विश्वासही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.